माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 3 डिसेंबर 2021 रोजी आर्थिक तंत्रज्ञान संदर्भातील (फिनटेक) या 2-दिवसीय विचार नेतृत्व मंच “इन्फिनिटी मंच ” चे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम भारत सरकारच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) द्वारे गिफ्ट (GIFT) सिटी आणि ब्लूमबर्ग यांच्या सहकार्याने 3 आणि 4 डिसेंबर 2021 रोजी आयोजित केला जात आहे. इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका आणि युनायटेड किंग्डम हे या मंचाच्या पहिल्या आवृत्तीतील भागीदार देश आहेत.
माननीय पंतप्रधानांनी यापूर्वी वेगळ्या प्रसंगी बोलताना “फिनटेक आणि उद्योग 4.0 चे भविष्य भारतात उदयास येत आहे. भारत जसा इतरांकडून शिकेल, त्याचप्रमाणे आम्ही आमचे अनुभव आणि कौशल्य जगासोबत सामायिक करू.कारण, भारत जी दिशा दाखवतो ती इतरांसाठी देखील आशेचा किरण ठरते. आणि, आपण भारतासाठी जे स्वप्न पाहतो तेच आपण जगासाठीही पाहतो.हा प्रवास सर्वांचा समान आहे” यावर भर दिला होता.
इन्फिनिटी मंच हा आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाचा प्रमुख आर्थिक तंत्रज्ञान आणि जागतिक विचार नेतृत्व कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरातील समस्या, प्रगतीशील कल्पना, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शोधले जाते , त्यावर चर्चा केली जाते आणि उपायही विकसित केले जातात.आणि का कार्यक्रम सर्वसमावेशक विकासासाठी आणि मोठ्या प्रमाणावर मानवतेची सेवा करण्यासाठी फिनटेक उद्योगाद्वारे तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचा लाभ कसा घेता येईल यावर चर्चा करण्यासाठी आणि कृती करण्यायोग्य दृष्टीकोन ठेवत धोरण, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या लोकांना एकत्र आणतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री मुकेश अंबानी, सॉफ्टबँकचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मासायोशी सोन, आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक श्री. नंदन निलेकणी हे या कार्यक्रमात सहभागी होणारे काही प्रमुख वक्ते आहेत.
यापूर्वी केंद्रीय वित्त कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 च्या भाषणात, गुजरात आंतरराष्ट्रीय वित्तीय टेक-सिटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (GIFT IFSC) या देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) येथे “जागतिक दर्जाच्या फिनटेक मध्यवर्ती केंद्राला ” पाठबळ देण्याची घोषणा केली होती.
आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण ही भारतातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधील वित्तीय उत्पादने, वित्तीय सेवा आणि वित्तीय संस्थांच्या विकास आणि नियमनासाठी एक एकीकृत प्राधिकरण आहे.
हा इन्फिनिटी मंच 4 डिसेंबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाच्या आय – स्प्रिंट’21 (I-Sprint’21) मालिकेअंतर्गत आयोजित केलेल्या आभासी माध्यमातील प्रदर्शनात अंतिम स्पर्धकांसह भारतातील निवडक फिनटेक आणि भागीदार देशांना त्यांचे नवोन्मेष दाखवण्याची संधी देईल. तसेच फिनटेक उद्योगाचा दृष्टीकोन आणि प्राधान्यक्रम तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. हा मंच, भारतातील महाविद्यालये आणि विद्यापीठे आणि भागीदार देशांतील विद्यार्थ्यांना या मंचाच्या विविध सत्रांतून सुचवलेल्या धोरण शिफारशींवर ‘कॉल फॉर अॅक्शन स्टेटमेंट’ विकसित करणे आणि सादर करण्याची संधी प्रदान करेल. नीती आयोग, इन्व्हेस्ट इंडिया, फिक्की (FICCI) आणि नॅसकॉम (NASSCOM) हे या वर्षीच्या मंचाचे प्रमुख देशांतर्गत भागीदार आहेत.
इन्फिनिटी मंचाचे संकेतस्थळ आणि कार्यक्रमपत्रिका काल प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आणि त्यासाठी नोंदणी करण्यासाठी, www.infinityforum.in या संकेतस्थळाला भेट द्या..