राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 28 नोव्हेंबर 2021 रोजी हरीद्वार येथील पतंजली विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभाला उपस्थिती लावली आणि संबोधित केले.
स्वामी रामदेव यांनी योग लोकप्रिय करण्याकरता मोठे योगदान दिले असे उद्गार यावेळी संबोधित करताना राष्ट्रपतींनी काढले. स्वामी रामदेव यांनी अगणित सामान्य जनांना योगाभ्यासाशी जोडून त्यांचा लाभ करून दिल्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. योग हा एखाद्या पंथांशी वा धर्माशी निगडीत आहे असा काहींचा गैरसमज आहे परंतू शरीरमनाला निरोगी ठेवण्याची ती एक पद्धती आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. म्हणूनच जगातील कोणत्याही विचारधारेचे तसेच जीवनाच्या कोणत्याही मार्गावर असणारे लोक योगाभ्यासाचा अवलंब करतात. 2018 या वर्षी आपण सुरीनाम या देशाच्या दौऱ्यावर असताना सुरीनामच्या राष्ट्रपतींसोबत योगदिन साजरा केल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. अरब योगा फाउंडेशनच्या नौफ मारवाई यांना 2018 मध्ये योगाभ्यासाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. योगाभ्यास हा सर्वांचा आणि सर्वांसाठी आहे असा आपला विश्वास असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपतींनी यावेळी केले.
आधुनिक वैद्यकशास्त्राने अनेक रचनांचा वापर करत उपचारपद्धतीत आश्चर्यकारक प्रगती केली आहे. तरीही जगातील सर्वोत्तम रचना असलेल्या मानवी शरीराचा आयुर्वेद आणि योगशास्त्राने सखोल विचार करून त्यावर संशोधन केले आहे. आणि त्याच शरीरपद्धतीच्या अभ्यासातून स्वतःची परिणामकारक उपचारपद्धती विकसित केली आहे. मानवाचा निसर्गाशी सुसंवादी सहयोग हे आयुर्वेद व योग यांचे लक्ष्य आहे.
स्वदेशी व्यवसायिकता आणि त्यातून रोजगार निर्मिती या संकल्पनांवर आधारित शिक्षण देऊन पंतजली विद्यापीठ भावी पिढ्यांना राष्ट्रउभारणीसाठी तयार करत आहे असे राष्ट्रपती म्हणाले. पंतजली संस्था समूह उपक्रमातून “व्यावसायिकतेवर आधारित भारतीयत्व” आणि “उपक्रमाधारित भारतीयत्व” विकसित होत आहे असे आपण आनंदाने नमूद करत आहोत असे ते म्हणाले
आधुनिक काळाशी सुसंगत पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांची सांगड घालत भारताला ज्ञानाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम शक्ती बनवण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गावर पातंजली विद्यापिठाची वाटचाल सुरू आहे. या विद्यापिठाच्या प्रयत्नांतून भारतीय ज्ञानविज्ञानाला बळ मिळेल आणि आधुनिक दृष्टीकोनातून आयुर्वेद व योगाला जगात मानाचे स्थान मिळेल असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
पातंजली विद्यापिठाने आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी विशेष विभाग स्थापन केल्याबद्दल राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या पुढाकाराने भारतीय मूल्ये व पारंपारिक ज्ञान यांचा जगभर प्रसार करता येईल. आणि हे या विद्यापीठाचे 21व्या शतकातील भारताला मोठे योगदान असेल असे राष्ट्पती म्हणाले.
पातंजली विद्यापीठात स्त्री स्नातकांची संख्या पुरुष स्नातकांपेक्षा जास्त असल्याचे नमूद करून राष्ट्रपतींनी परंपरेवर आधारित आधुनिक शिक्षणाचा प्रसार करण्यात आपल्या देशातील लेकी पुढे असल्याचा आनंद व्यक्त केला.
याच स्त्री स्नातकांमधून आधुनिक युगातील गार्गी , मैत्रेयी, अपाला, रोमाशा आणि लोपामुद्रा यासारख्या स्त्रिया निर्माण होतील आणि जागतिक मंचावर भारतीय शहाणीवेचे स्थान निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींच्या भाषणासाठी येथे क्लिक करा