केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी काल संध्याकाळी कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरात सुरु असलेल्या विकासविषयक उपक्रमांच्या सशक्तीकरणासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेण्यासाठी तातडीची आढावा बैठक घेतली. या बंदराशी संबंधित कामे तसेच परिसरात असलेल्या बंदर-आधारित उद्योग आणि त्यांचे सुरळीत परिचालन याबाबतीत सुरु असलेल्या उपक्रमांचा देखील आढावा घेतला. या आढावा बैठकीला बंदराचे अध्यक्ष विनीत कुमार, उपाध्यक्ष, विभागीय प्रमुख आणि कोलकाता गोदीच्या यंत्रणेतील भारतीय अंतर्गत जलमार्ग प्राधिकरण आणि जहाजबांधणी मर्या. या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांनी कोलकाता येथील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. मात्र, सर्व भागधारक, व्यापार आणि वाणिज्य समुदाय तसेच एकुणात राज्यातील जनता यांच्या लाभासाठी खालील प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे आदेश यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिले:
(1)पश्चिम बंगाल मधील सागरी विमान प्रकल्पाची व्यवहार्यता,
(2) प्रवासी जेट्टींचा विकास,
(3) इच्छामोती नदीवर रो-रो आणि सामान वाहतूक प्रकल्पाचा विकास, आणि
(4) पश्चिम बंगाल मधील राष्ट्रीय जलमार्ग-I भागात जहाजे आणि बार्ज यांच्या दुरुस्तीसाठीच्या सुविधांचा विकास.