वर्ष 2030 पर्यंत 1 लाख कोटी डॉलर मूल्याच्या सेवा निर्यातीचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत सज्य असल्याचा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तथा वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला.
ते आज नवी दिल्लीत ‘सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या’, ‘जागतिक सेवा महासंमेलन- 2021’ या कार्यक्रमात बोलत होते.
सेवाक्षेत्र म्हणजे भारताच्या आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले.
सेवाक्षेत्रामुळे सुमारे 2.6 कोटी लोकांना रोजगार मिळत असून भारतातून जगभर होणाऱ्या निर्यातीत अंदाजे 40% वाटा सेवाक्षेत्राचा असतो, अशी माहितीही गोयल यांनी दिली. वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये सेवाक्षेत्रातील व्यापाराचा अधिशेष 89 अब्ज डॉलर इतका होता. तसेच जगभरात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक भारतातच येते (2000-2021 दरम्यान 53% थेट परकीय गुंतवणूक भारतात दाखल), असेही त्यांनी सांगितले.
‘जागतिक सेवा महासंमेलन- 2021’ या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना – ‘भारताच्या सेवाक्षेत्राच्या संदर्भाने माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञानाधारित सेवांपलीकडील विकाससंधींची चाचपणी’ अशी होती.
सेवाक्षेत्रातील कौशल्ये, स्टार्ट-अप उद्योग आणि माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित क्लृप्त्या यांमुळे सेवाक्षेत्रात आपल्याला स्पर्धात्मकतेच्या दृष्टीने मोठा फायदा मिळत असल्यावर मंत्रिमहोदयांनी भर दिला. सार्वत्रिक पसंती आणि सार्वत्रिक स्वीकृती अशी दोन्ही सामर्थ्ये भारतीय सेवांच्या ठायी असल्याचे निरीक्षण गोयल यांनी नोंदविले.
कोरोना साथीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजे ‘घरून काम करण्याच्या’ सुविधेप्रती भारताने दाखवलेल्या वचनबद्धतेचे गोयल यांनी कौतुक केले. या काळात अन्य देशांमध्ये सेवा क्षेत्रातील व्यापार खालावला असताना भारतात मात्र सेवा क्षेत्राने कमालीची लवचिकता दाखवून दिली आणि टिकाव धरला, अशा शब्दांत त्यांनी समाधान व्यक्त केले.
“कोविड -19 मुळे फटका बसलेल्या पर्यटन, आतिथ्य आदी क्षेत्रांमध्ये आता सुधारणा होण्याची चिह्ने दिसत आहेत”, असे त्यांनी सांगितले.
2020 मध्ये दोन क्रमांकांनी वर चढून भारत जगातील सातव्या क्रमांकाचा सेवा निर्यातदार बनला, असे गोयल म्हणाले. क्रय व्यवस्थापकांच्या निर्देशांकात सेवाक्षेत्राच्या बाबतीत ऑक्टोबर-2021 मध्ये 58.4 इतकी म्हणजे दशकभरातील सर्वोच्च पातळी गाठण्यात भारताला यश मिळाले, असेही ते म्हणाले.
जगातील सर्वात मोठा सेवा निर्यातदार होण्याची भारताची क्षमता असल्याचे प्रतिपादन पीयूष गोयल यांने केले. तसेच निव्वळ ‘असेंब्ली इकॉनॉमी’ म्हणजे ‘जुळवाजुळव करणाऱ्या अर्थव्यवस्थेतून’ ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत भारताचे रूपांतरण होण्यासाठी सेवाक्षेत्रामुळे गती मिळाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘भारतात का?’ या भावनेपासून परिवर्तन होत जाऊन जग आता, ‘भारतातून जगाला सेवा पुरवण्यापर्यंत’ पोहोचले आहे, असे गोयल म्हणाले.
“एकेकाळी जगाचे ‘बॅक ऑफिस’ म्हणजे केवळ साहाय्यभूत कार्यालय म्हणून कार्यरत असलेला भारत आता जगाचे ‘ब्रेन ऑफिस’ म्हणजे ‘बुद्धीकेंद्र’ बनला असून, मायक्रोसॉफ्ट, गूगल वगैरे कंपन्यांची अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी कार्यालये भारतातच आहेत, व त्या दृष्टीने ते भारताकडे विश्वासाने बघतात”, यावरही गोयल यांनी भर दिला.
‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेजच्या तसेच व्यवसायांसाठी विनातारण कर्जे उपलब्ध करून देण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत सरकारने सेवा क्षेत्राला पाठबळ दिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
सरकारने विविध निर्यात प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून 56,027 कोटी रुपये वितरित केले असून, त्यापैकी 10,002 कोटी रुपये एस.इ.आय.एस. म्हणजे ‘भारतातून सेवा निर्यात योजनेच्या’ अंतर्गत वितरित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबो तंत्रज्ञान अशा उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये कौशल्यविकास करण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली.
जिल्ह्यांना निर्यातकेंद्रे बनवून सर्वंकष निर्यात धोरण तयार करण्यासाठी राज्यांना मदत करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उक्तीच्या आधारे ते म्हणाले, “आपले ध्येय अनंत आकाशाइतके उत्तुंग असू शकते, परंतु एकमेकांच्या साथीने सतत पुढे पुढे चालत राहण्याचा निर्धार आपल्या मनात कायम असेल तर आपण निश्चितपणे विजयी होऊ शकू !”