आदिवासी गौरव दिनानिमित्त पंतप्रधानांनी रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे केले उद्घाटन

दैनिक समाचार

भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज रांची येथील भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाचे उद्घाटन केले. झारखंडचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, भारतातील आदिवासी परंपरा आणि त्यांच्या शौर्याच्या कहाण्यांना हा देश अधिक अर्थपूर्ण आणि अधिक मोठी ओळख प्राप्त करून देईल असा निश्चय  आपल्या देशाने केला आहे “याकरिता, आजपासून दरवर्षी आपला देश भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असलेला 15 नोव्हेंबर हा दिवस ‘आदिवासी गौरव दिवस’ म्हणून साजरा करेल असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे,” असे या ऐतिहासिक प्रसंगी देशाला शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी सांगितले.

ज्यांच्या प्रबळ इच्छेमुळे झारखंड राज्य निर्माण झाले त्या अटल बिहारी वाजपेयी यांना देखील पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली. “देशाच्या सरकारमध्ये स्वतंत्र आदिवासी मंत्रालयाची निर्मिती करून देशाच्या धोरणांना आदिवासी समाजाच्या हिताशी जोडण्याचे काम सर्वप्रथम अटलजी यांनी केले,” असे त्यांनी पुढे सांगितले.

भगवान बिरसा मुंडा स्मृती उद्यान आणि स्वातंत्र्य सैनिक वस्तुसंग्रहालयाच्या निर्मितीबद्दल पंतप्रधानांनी आपल्या देशातील आदिवासी समुदाय आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “हे वस्तुसंग्रहालय आदिवासी शूरवीर आणि वीरांगनांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दर्शविणारे आपल्या वैविध्यपूर्ण आदिवासी संस्कृतीचे जितेजागते ठिकाण होईल.”

भगवान बिरसा यांच्या दूरदृष्टीबद्दल बोलताना, आधुनिकतेच्या नावाखाली आपली विविधता, प्राचीन ओळख आणि निसर्ग यांचे नुकसान करणे समाजाच्या हिताचे नाही हे भगवान बिरसा जाणून होते याकडे पंतप्रधान यांनी निर्देश केला. मात्र याचवेळी बिरसा आधुनिक शिक्षणाचे पुरस्कर्ते होते आणि त्यांच्या समाजातील कमतरता आणि वाईट गोष्टींबद्दल आवाज उठविण्याचे धैर्य त्यांच्यात होते असे मोदी यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले कि भारतासाठीचे निर्णय घेण्याची शक्ती भारतीयांच्या हाती सोपविणे  हेच स्वातंत्र्य चळवळीचे लक्ष्य होते. मात्र त्याचवेळी, धरती आबा म्हणून प्रसिध्द असलेल्या मुंडा यांनी भारतातील आदिवासी समाजाची ओळख पुसून टाकण्याची इच्छा असणाऱ्या विचारधारेविरुद्ध देखील त्यांचा लढा सुरु होता. भगवान बिरसा समाजासाठी जगले, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या देशासाठी त्यांनी त्यांचे प्राण अर्पण केले. म्हणूनच ते आपले पूज्यस्थान  म्हणून आपल्या विश्वासात, आपल्या उर्जेत अजूनही जिवंत आहेत” “धरती आबा या पृथ्वीवर फार काळ राहिले नाहीत. पण त्यांच्या छोट्या जीवनकाळात त्यांनी देशासाठी अख्खा इतिहास लिहिला आणि भारतातील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले.” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

https://youtu.be/eVNoDMCCPuU

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *