देशातील आदिवासी समुदायांना समर्पित आठवडाभर चालणारा उत्सव 15 नोव्हेंबरपासून संपूर्ण देशभरात उत्साहात सुरू आहे आणि आदिवासी संस्कृतीच्या विविध छटांचे दर्शन घडवतो आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला ‘आदिवासी गौरव दिन ‘ सोहळा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात सुरू आहे. 15 नोव्हेंबरला महान आदिवासी स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती असून दरवर्षी हा दिवस जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा केला जाईल. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी देशभरात 15 नोव्हेंबरपासून विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
या उत्सवांदरम्यान 13 राज्ये आणि नवी दिल्लीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भगवान बिरसा मुंडा यांचे नातू सुखराम मुंडा यांनी दिल्ली हाट येथे आदिवासींचा राष्ट्रीय उत्सव असलेल्या आदि महोत्सवाचे उद्घाटन केले, जो 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. आदिवासी कलाकुसर, पाककृती आणि विविध आदिवासी समुदायांचा वारसा यांची भव्यता या महोत्सवात पहायला मिळेल. 200 हून अधिक स्टॉल्स असलेल्या प्रदर्शनात देशभरातील कारागिरांनी हाताने विणलेले सुती , रेशमी कपडे, हाताने बनवलेले दागिने आणि स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेता येईल.