ठळक मुद्दे
- राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र उभारणी आणि रस्ते सुरक्षा जागृतीचा संदेश देण्यासाठी देशाच्या चारही दिशांच्या प्रदेशात प्रवास करत इंडिया@75 बीआरओ मोटरसायकल मोहीम स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे.
- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 14 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्लीत या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला.
- कोलकाता येथे 27 नोव्हेंबर 2021 रोजी पोहोचून मोहिमेने चौथा टप्पा पूर्ण केला. न थांबता केलेल्या 44 दिवसांच्या प्रवासात 10,000 किलोमीटरहून अधिक अंतर कापण्यात आले.
- मोहिमेचा पुढचा टप्पा ‘कन्याकुमारी’कडे
इंडिया@75 बीआरओ मोटरसायकल मोहिमेने 27 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे पोहोचण्यापूर्वी सहा राज्यांमधून प्रवास करत 12 दिवसांत 3,200 किलोमीटरचा चौथा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला. कोलकाता येथे पूर्व किनार्याला पोहोचण्यापूर्वी पथकाने ईशान्येकडील आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि मेघालय या राज्यांच्या डोंगराळ प्रदेशातून प्रवास केला. कोलकात्याला पोहोचण्यापूर्वी पथकाने जोरहाट, दिमापूर, इम्फाळ, सिलचर, आयझॉल, शिलाँग, अलीपुरद्वार, मालदा या शहरांमध्ये प्रवास केला.
या मोहिमेला 14 ऑक्टोबर 2021 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथून झेंडा दाखवला. हिमाचल, लेह आणि लडाख, जम्मू आणि काश्मीरमधील उंचावरील आणि बर्फाच्छादित भागांमधून प्रवास केल्यावर दुसर्या टप्प्यात मोहिमेने सिलीगुडी येथे टप्पा संपण्यापूर्वी पंजाबचा मैदानी प्रदेश, उत्तराखंडच्या टेकड्या आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालच्या गंगेच्या मैदानी प्रदेशात प्रवास केला. तिसऱ्या टप्प्यात, मोहीम नाथू ला, गंगटोक, कालिम्पॉंग, हाशिमारा, गुवाहाटी, तेजपूर, इटानगर, पासीघाटमार्गे कोलकात्याच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी आसाममधील डूम डूमा या पूर्वेकडील शहरात पोहोचली.
मोहिमेत पथकाने प्रेरक व्याख्याने आयोजित केली आणि जोरहाट, दिमापूर, इम्फाळ, सिल्चर, आयझॉल, शिलाँग, अलीपुरद्वार, मालदा आणि कोलकाता इथल्या युवा पिढीशी शालेय मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सशी संवाद साधला. राष्ट्र उभारणीत ते कशा प्रकारे योगदान देऊ शकतात याविषयी तरुणांशी सखोल चर्चाही त्यांनी केली. तरुणांनी बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनाइझेशन-सीमा रस्ते संस्था) आणि भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी आणि देशाची सेवा करण्यासाठी दाखवलेले स्वारस्य आणि विचारलेले प्रश्न यामुळे पथकाला आनंद झाला. मार्गावरील सर्व वयोगटांमधल्या व्यक्तींना सहभागी करून घेऊन प्रश्नमंजुषेसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करून जवळजवळ दररोज असंख्य लोकांशी संपर्क साधत पथकाने जागरूकता संदेश पोहोचविण्यात पथक यशस्वी झाले. पथकाने स्थानिकांशी संवाद साधला, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना भेट दिली आणि विविध ठिकाणी माजी सैनिकांशी संवाद साधला.
प्रत्येक ठिकाणी पथकाचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी माजी आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या सरिता देवी आणि भारतीय मुष्टियोद्धा प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते एल इबोमचा सिंग यांच्याशी संवाद साधला. मणिपूरचे राज्यपाल एल ए गणेशन यांनी पथकाशी संवाद साधला आणि ईशान्येकडील रस्ते पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बीआरओची प्रशंसा केली. राज्यपालांनी पथकाला पुढील मार्गक्रमणासाठी हिरवा झेंडा दाखवला. मिझोरामचे क्रीडा आणि युवा सेवा मंत्री पु रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी स्वतः मोटारसायकल चालवून या मोहिमेत भाग घेतला आणि आयझॉलच्या सीमेपलीकडे पथकाला निरोप दिला.
इंडिया@75 बीआरओ मोटरसायकल मोहिमेने आजपर्यंत 10,000 किमी पेक्षा जास्त अंतर कापले आहे आणि त्याचा जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण झाला आहे. पथकातल्या सदस्यांनी अविस्मरणीय आठवणी, आजीवन बंध निर्माण केले आहेत, लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण केली आहे. ही मोहीम आता भारताच्या दक्षिणेकडील टोकावरील कन्याकुमारीच्या दिशेने मार्गक्रमण करेल.