पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात पंढरपूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या पाच विभागाचे आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे तीन विभाग यांचे चौपदरीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले. याशिवाय राज्यातील महत्वाच्या तीर्थ क्षेत्रांना पंढरपूरशी जोडणाऱ्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे त्यांनी राष्ट्रार्पण केले. 574 किलोमीटर लांबीच्या या कामाचा अंदाजे खर्च 12,294 कोटी रुपये आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारीआणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी रस्तेवाहतूक आणि केंद्रीय महामार्ग राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्यासह केंद्रीय मन्त्री नारायण राणे, भागवत कराड, कपिल पाटील ,भारती पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळेला बोलताना पंतप्रधान म्हणाले की अनेक परकीय आक्रमणं आणि नैसर्गिक आपत्ती आल्या तरीही निरंतर सुरु असलेली पंढरपूरच्या विठ्ठलाची ही वारी जगातली सर्वात जुनी यात्रा आणि मोठी जन चळवळ आहे. लाखो भाविकांना आकर्षून घेणारी, त्यांच्या अनोख्या शिस्त आणि सामुहिक वर्तनाचे प्रतिक असलेली आषाढ वारी ही भारताच्या शाश्वत परंपरेची द्योतक आहे . विठठलाच्या अनेक पालख्या वेगवेगळ्या मार्गाने येत असल्या तरी त्याचे पोहोचण्याचे ठिकाण जसे पंढरपूर आहे , तसे, मार्ग वेगळे असले तरी आपले सर्वांचे लक्ष्य एकच आहे आणि अंतिमतः सर्व पंथ हे भागवत पंथ अशी शिकवण देणारी ही वारी आहे असे त्यांनी सांगितले.
विष्णुमय जग ,भेदाभेद अमंगळ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत पंतप्रधानानी सांगितले की वारीमध्ये जातपात ,स्त्री पुरुष असा कुठलाही भेद नाही आणि सर्वसमानतेचे हे एक दुर्मिळ उदाहरण आहे.
जेव्हा मी सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास असे म्हणतो त्यामागे ही अशीच भावना असते जी सगळ्यांना सोबत घेत आपल्याला देश विकासासाठी प्रेरित करते असे ते म्हणाले
रस्ते हे विकासाचे द्वार असतात आणि आज भूमिपूजन आणि लोकार्पण होत असलेले प्रकल्प आणि पालखीमार्ग मार्ग हे भागवत धर्माची पताका उंचावणारे मार्ग असेतील असे पंतप्रधान म्हणाले. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला पायी चालणार्या भाविकांसाठी विशेष समर्पित मार्ग असतील असे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवरया महामार्गाच्या दोन्हीबाजूला सावली देणारे वृक्ष लावणे, पिण्यासाठी ठराविक अंतरावर शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे आणि भविष्यात पंढरपूर हे देशातील सर्वात स्वच्छ तीर्थक्षेत्र अशी ओळख करून देण्याचे काम जनभागीदारीच्या स्वरुपात करून आपल्याला आशीर्वाद द्यावा अशी मागणी पंतप्रधानांनी यावेळी केली.
आपल्या प्रास्ताविक भाषणात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी म्हणाले की त्यांचे मंत्रालय 20 हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या बौद्ध सर्किट च्या धर्तीवर कैलास मानसरोवर पर्यंत जाण्यासाठी मार्ग बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
महाराष्ट्राच्या कला, साहित्य आणि संस्कृतीमध्ये संतांचे मोठे योगदान असून या संताना प्रेरणा देणारे पंढरपूर हे महत्वाचे ठिकाण आहे , असे गडकरी यांनी सांगितले. पंढरपूरच्या वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावरील 8 रस्ता चौपदरीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन आणि माहूर येथील रेणुका , शेगाव येथील श्री गजानन महाराज ,तुळजापूर येथील भवानीमाता यासह राज्यातील अन्य महत्वाच्या तीर्थस्थळांना पंढरपूरशी जोडणाऱ्या 5 राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण हा एक आनंदाचा क्षण आहे, असे गडकरी म्हणाले. या दोन्ही पालखी मार्गाचे काम आगामी सव्वा वर्षात पूर्ण करणार असे गडकरी यांनी यावेळी सांगितले .
या पालखी मार्गालगत इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकारबरोबर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वारीदरम्यान सगळ्या पालख्या जिथे एकत्र येतात त्या ‘वाखरी’ ला पंढरपूरशी जोडणाऱ्या 8 किमी लांबीच्या मार्गासाठी ७४ कोटी रुपयांची तरतूद केली असून या मार्गाचा समावेश पालखीमार्ग प्रकल्पात केला आहे असे त्यांनी सांगिले.
पालखी मार्गावरील सर्व अडथळे दूर करण्यासाठी केन्द्र सरकार आणि गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे आणि राज्य सरकार ही यासाठी आवश्यक ती मदत पुरवेल असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
वारकरी संप्रदाय हा ऐहिक सुखाच्या पलीकडे जाऊन वारीत सहभागी होत असतो आणि हा भारावून टाकणारा अनुभव असे ठाकरे म्हणाले. परकीय आक्रमण झेलूनही वारकरी संप्रदायाने ही वारीची परंपरा चालू ठेवली याबद्दल ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली
प्रकल्पाविषयी
दिवे घाट ते मोहोळ या 221 किलोमीटरच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणासाठी अंदाजे 6690 कोटीं रुपये तर संत तुकाराम पालखी मार्गाच्या पाटस ते तोंडाळे बोंडाळे या 130 किलोमीटरच्या चौपदरीकरणासाठी 4,400 कोटी रुपये अनुक्रमे खर्चअपेक्षित आहे . यामध्ये म्हसवड- पिळीव- पंढरपूर (NH 548E), पंढरपूर- सांगोला (NH 965C), NH 561A वरील टेंभूर्णी पंढरपूर भाग, आणि NH 561A वरील पंढरपूर मंगळवेढा उमडी हा भाग यांचा समावेश आहे.
याशिवाय राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना पंढरपूरशी जोडणाऱ्या 1180 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 223 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीच्या 5 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे राष्ट्रार्पण आज झाले त्यात संत गोंदवलेकर पालखी मार्ग , संत सावता माळी पालखीमार्ग , संत एकनाथमहाराज पालखी मार्ग आणि संत गजानन महाराज पालखी मार्ग या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे.
केवळ पालखीसाठी राखीव मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला बांधले जातील ज्यामुळे भक्तगणांना मार्गक्रमणेसाठी विनावर्दळ आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वारकर्यांच्या विश्रांतीसाठी १२ तर संत तुकाराम पालखी मार्गावर ११ विश्रान्तिस्थळे असणार आहेत.
यामुळे श्रीविठ्ठलाच्या दर्शनाला देशातील सर्व भागातून आणि पंढरपूरच्या बाहेरुन येणाऱ्या भक्तगणांची सोय होईल.
https://www.youtube.com/embed/uKiDvnH8HVA
***