“जगातील नवनव्या घडामोडींसाठी अनुकूल ठरतील अशा पद्धतीने विद्यापीठांनी त्यांच्या अभ्यासक्रमांचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल केले पाहिजेत. आणि देशाच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार नवीन अभ्यासक्रम सुरु केले पाहिजेत” अशी अपेक्षा उपराष्ट्रपती एम. वेंकैय्या नायडू यांनी आज व्यक्त केली.
बेंगळुरूमध्ये पीईएस विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षान्त समारंभात उपराष्ट्रपती बोलत होते. “चौथी औद्योगिक क्रांती आज आपल्याला साद घालत आहे आणि तिचा उत्तम फायदा उठवण्यासाठी आपल्या विद्यापीठांनी आणि तांत्रिक संस्थांनी विद्यार्थ्यांना 5-जी, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबो तंत्रज्ञान अशा आधुनिक विद्याशाखांचे प्रशिक्षण द्यावे”, असेही ते म्हणाले.
भारताच्या शिक्षणक्षेत्रातील संपन्न भूतकाळाचा संदर्भ देत उपराष्ट्रपतींनी, भारताला ज्ञानसत्ता म्हणून घडविण्याच्या दृष्टीने तंत्रशिक्षण विद्यापीठांचे महत्त्व विशद केले. अंतराळ क्षेत्रात खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या सरकारच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इसरो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था यांच्या सहकार्याने दोन उपग्रहांची निर्मिती व प्रक्षेपण केल्याबद्दल पीईएस विद्यापीठाचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. “आपल्या खासगी संस्था आणि विद्यापीठांनी या संधीचा फायदा उठवून भारताला अंतराळ क्षेत्रात स्वयंपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत बनविण्यासाठी प्रयत्न करावेत” असे आवाहनही त्यांनी केले.
त्या दोन उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ.व्ही.सांबशिव राव यांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
अर्थव्यवस्थेच्या विभिन्न क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानामुळे होऊ शकणाऱ्या फायद्यांविषयी सांगताना उपराष्ट्रपतींनी ‘ड्रोन्सचे जागतिक केंद्र बनण्याचे सामर्थ्य भारताकडे असल्याचे’ प्रतिपादन केले. यासाठी अभिनव संकल्पना आणि नवविचारांच्या बाबतीत परंपरेने चालत आलेले भारताचे सामर्थ्य, माहिती तंत्रज्ञान आणि काटकसर करण्याच्या दृष्टीने उचित अशी भारतातील अभियांत्रिकी, यांच्या मदतीने हे शक्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या दृष्टीने कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पीईएस विद्यापीठात ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्याविषयी विचारमंथन होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
2020 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज त्यांनी व्यक्त केली . तंत्रशिक्षणाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी विद्यापीठांना केले.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यासह विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.