सैन्यदलप्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत यांनी नागपूरमध्ये संरक्षण विभागाच्या आस्थापनांना भेट दिली. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत संरक्षण क्षेत्रातील एतद्देशीय खासगी उद्योजकांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांविषयी त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी इकॉनॉमिक एक्सप्लोसीव्हज लिमिटेड (ईईएल) लाही भेट दिली. ती कंपनी नव्याने विकसित करत असलेल्या उत्पादनांची माहिती त्यांना देण्यात आली. यामध्ये मल्टिमोड प्रकारचे हातबॉम्ब, अन्य स्फोटके, क्षेपणास्त्रे आणि सशस्त्र ड्रोन इत्यादींचा समावेश होता. कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनी विविध उत्पादन प्रकल्पांविषयी त्यांना कल्पना दिली.
मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ- एअर मार्शल शशिकर चौधरी आणि उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग – मेजर जनरल दिनेश हूडा यांनी सीडीएस बिपिन रावत यांचे स्वागत केले. ईईएल च्या भेटीनंतर नागपुरातील वायुदलाच्या मेंटेनन्स कमांडला भेट दिली. त्यावेळी एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी त्यांना, वायुदलाच्या विविध विमाने व अन्य उपकरणे सेवा देण्याच्या दृष्टीने सदोदित सज्ज ठेवण्यासाठी मेंटेनन्स कमांड बजावत असलेल्या भूमिकेची माहिती दिली.
त्यानंतर मेजर जनरल दिनेश हूडा यांनी सैन्यदलप्रमुख (सीडीएस) रावत यांना, कोविड-19 बचाव आणि प्रतिसाद यासाठी, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली. या उपक्षेत्राचे कार्यालय मार्च 2018 मध्ये मुंबईहून नागपूरला हलविले गेल्यानंतर झालेला पायाभूत सुविधा विकास, पर्यावरणीय कामे, आणि अन्य उपक्रम रावत यांना दाखविण्यात आले.