केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त भारतातील पत्रकार आणि माध्यमकर्मीना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, “सरकारने नागरिक केंद्री संवादावर – त्यांना समजेल अशा भाषेत आणि त्यांना सहज उपलब्ध असलेल्या माध्यमावर – मग त्या दूरचित्रवाणीवरील बातम्या, रेडिओ, सोशल मीडिया किंवा ऑनलाइन डिजिटल मीडिया असेल , यावर लक्ष केंद्रित केले आहे .”
ते पुढे म्हणाले की, “राष्ट्रीय पत्रकार दिन हा भारतातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात माध्यमे आणि पत्रकारांची भूमिका मांडण्याचा दिवस आहे. प्रसारमाध्यम हे एक प्रकारचे पहारेकरी असून भारतासारख्या सशक्त लोकशाहीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.”
खोट्या बातम्यांविरोधात सामूहिक लढा देण्याचे आवाहन करताना ठाकूर म्हणाले, “आजच्या दिवशी मी माध्यमांमधील माझ्या मित्रांना खोट्या बातम्या आणि चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन करतो. यासंदर्भात केंद्र सरकारने पत्र सूचना कार्यालयात फॅक्ट चेक विभाग स्थापन करण्यासारख्या उपाययोजना केल्या आहेत, ज्या लोकप्रिय झाल्या आहेत. ”
आपल्या संदेशाच्या अखेरीस नवीन महत्वाकांक्षी भारताच्या उभारणीसाठी माध्यमांना निमंत्रित करून ते म्हणाले, “ज्याप्रमाणे आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत आहोत आणि पुढील 25 वर्षांकडे पाहत आहोत- अशा वेळी प्रत्येक भारतीयाची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण भागीदार म्हणून एकत्र काम करूया.”