पहिल्या लेखापरीक्षण दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण

दैनिक समाचार

कार्यक्रमात आपल्या सोबत उपस्थित देशाचे कम्पट्रोलर ऍन्ड ऑडिटर जनरल श्री जीसी मुर्मू जी, डेप्युटी CAG  परवीन मेहता जी, या महत्वपूर्ण संस्थेच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी समर्पित सर्व सदस्य आणि उपस्थित स्त्री-पुरुषांना लेखापरीक्षण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

कॅग ही एक संस्था म्हणून केवळ देशाच्या खात्यांच्या हिशोबाची तपासणीच करत नाही, तर उत्पादकता, कार्यक्षमतेत ‘मूल्यवर्धन’ देखील करते. म्हणूनच, ऑडिट डे आणि त्याच्याशी संबंधित कार्यक्रम, या प्रसंगी आमचे विचारमंथन आमच्या सुधारणांचा आणि सुधारक कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मी तुम्हा सर्वांचे तुमच्या निष्ठेबद्दल, कॅगची प्रासंगिकता आणि प्रतिष्ठेला सातत्याने नवी दिशा दिल्याबद्दल अभिनंदन करत आहे.

मित्रांनो,

अशा फारच कमी संस्था असतात ज्या काळ पुढे सरकत असताना अधिक बळकट होत जातात, अधिक प्रगल्भ होत राहतात आणि अधिक उपयुक्त होत राहतात. अनेक संस्थांची निर्मिती होते. तीन दशके, चार दशके, पाच दशके उलटून जाता जाता परिस्थिती इतकी बदलते की त्या कधी कधी आपले महत्त्वच गमावून बसतात. पण कॅगच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो की इतक्या वर्षांनंतरही ही संस्था म्हणजे स्वतःच एक खूप मोठा वारसा आहे, खूप मोठा ठेवा आहे आणि प्रत्येक पिढीला हा ठेवा सांभाळायचा आहे, तिला सावरायचे आहे, सजवायचे आहे आणि भावी काळातील पिढ्यांसाठी अधिक उपयुक्त बनवून तिला संक्रमित करायचे, वहन करायचे आहे आणि ही एक खूप मोठी जबाबदारी देखील आहे, असे मला वाटते.

मित्रांनो,

गेल्या वेळी मी जेव्हा येथे आलो होतो, तेव्हा तुम्हा सर्वांशी भेट झाली होती. त्यावेळी आपण महात्मा गांधीजींची 150वी जयंती साजरी करत होतो. त्या कार्यक्रमात बापूंच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते. आणि आज ज्यावेळी ऑडिट दिवसाचा हा महत्त्वाचा कार्यक्रम होत आहे त्यावेळी देश आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज आपल्याला देशाच्या अखंडतेचे नायक सरदार पटेलजींच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले आहे. गांधीजी असोत, सरदार पटेल असोत किंवा मग बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रनिर्मितीमध्ये या सर्वांचे योगदान, कॅगसाठी, आपल्या सर्वांसाठी कोटी-कोटी देशवासियांसाठी खूप मोठी प्रेरणा आहेत. देशासाठी मोठी लक्ष्ये कशा प्रकारे निर्धारित केली जातात, त्यांना कशा प्रकारे साध्य केले जाते, कशा प्रकारे व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणले जाते, याची खूप मोठी शिकवण या महान व्यक्तिमत्वांच्या जीवनगाथा आपल्याला देत असतात.

मित्रांनो,

एक काळ होता ज्यावेळी लेखापरीक्षणाकडे एका शंकेने, एका भीतीने पाहिले जात होते. ‘कॅग विरुद्ध सरकार’ ही आपल्या व्यवस्थेची सामान्य विचारसरणी बनली होती. आणि कधी कधी तर असेही होत असायचे की सरकारी कर्मचारी असे आहेत, असेच काही तरी करतात. सरकारी कर्मचाऱ्यांना वाटायचे की कॅग वाले असेच आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीत काही तरी त्रुटी दिसत असते. प्रत्येकाचे आपले काही ना काही असायचे. पण आज ही मानसिकता बदलण्यात आली आहे. आज लेखापरीक्षणाला मूल्यवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग समजले जाऊ लागले आहे. सरकारच्या कामकाजाचे आकलन करत असताना  कॅग कडे एक बाह्य दृष्टीकोन असतो जी त्यांची जमेची बाजू आहे. तुम्ही जे काही आम्हाला सांगता, त्याद्वारे आम्ही नियोजनबद्ध सुधारणा करतो. या सूचनांना आम्ही सहकार्याच्या दृष्टीकोनातून पाहतो.

मला प्रदीर्घ काळ सरकारांचे नेतृत्व करण्याचे भाग्य लाभले आहे. ज्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी देखील मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगायचो आणि आज देखील हेच सांगतो, कॅगकडून जी कागदपत्रे आणि आकडेवारी मागितली जाते ती अगदी आवर्जून द्या, आपल्या कामाशी संबंधित इतर फायली देखील त्यांना द्या. यामुळे आपल्यासाठी अधिक चांगले काम करण्याचा मार्ग तयार होतो. आपले आत्मपरीक्षणाचे काम अतिशय सोपे होते.

मित्रांनो,

शुचिता आणि पारदर्शकता आपल्या वैयक्तिक जीवनात असो किंवा सरकारमध्ये असो. आपल्यासाठी आपले मनोधैर्य उंचावणारे हे कारक आहेत. याचे उदाहरण पाहायचे झाले तर आपल्या देशाच्या बँकिंग क्षेत्रात पारदर्शकतेच्या अभावामुळे वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब होत असायचा. याचा परिणाम असा झाला की बँकांची थकित कर्जे वाढत गेली आणि थकित कर्जांना गालिच्याखाली झाकण्याची जी कामे पूर्वी झाली, त्याच्याविषयी बहुतेक माझ्यापेक्षा जास्त तुमच्याकडे माहिती आहे. पण आम्ही संपूर्ण प्रामाणिकतेने मागच्या सरकारांचे सत्य, जी काही स्थिती होती, ती देशाच्या समोर खुली केली. आपल्याला समस्या लक्षात आल्या तरच आपण त्यावरील तोडगा शोधू शकतो.

याच प्रकारे आपल्याकडून वित्तीय तुटी संदर्भात सरकारी खर्चाविषयी सातत्याने इशारे दिले जात असायचे. आम्ही या चिंतांचा सकारात्मक पद्धतीने विचार केला. वापरात नसलेल्या आणि प्रमाणापेक्षा कमी वापर झालेल्या घटकांचे मुद्रीकरण करण्याचे धाडसी निर्णय घेतले. आज या निर्णयांच्या परिणामांमुळे पुन्हा एकदा वेगवान होणाऱ्या अर्थव्यवस्थेची चर्चा संपूर्ण जगात होत आहे. तिचा मान-सन्मान होत आहे. कॅगमध्ये ज्यावेळी याचे व्यापक स्वरुपात आकलन होईल त्यावेळी मला असे वाटते की असे अनेक पैलू पाहायला मिळतील जे कधी कधी तज्ञांकडूनही दुर्लक्षित होत असतात.

मित्रांनो,

आज आपण अशी व्यवस्था तयार करत आहोत ज्यामध्ये जुना विचार आहे, ‘सरकार सर्वम्, सरकार जानम, सरकार ग्रहणम’ हा जुना विचार बदलण्याचा आम्ही निर्धार केला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून सरकारचा हस्तक्षेप देखील कमी होत आहे आणि तुमचे काम देखील सोपे होत आहे. ‘मिनिमम गवर्नमेंट मैक्सिमम गवर्नेंस’ Contactless customs, automatic renewals, faceless assessments, service delivery साठी online applications,  या सर्व reforms मुळे सरकारचा अनावश्यक हस्तक्षेप संपुष्टात आला आहे.

व्यवस्थेमध्ये जेव्हा ही पारदर्शकता येते तेव्हा परिणाम देखील अतिशय सुस्पष्टपणे दिसू लागतात. आज भारत संपूर्ण जगात सर्वात मोठी तिसरी स्टार्ट अप eco-system बनला आहे. आज 50 हून जास्त भारतीय यूनिकॉर्न उभे राहिले आहेत. आपल्या IITs आज चौथ्या सर्वात मोठ्या यूनिकॉर्न निर्मात्या म्हणून उदयाला आल्या आहेत. ‘मिनिमम गवर्नमेंट मैक्सिमम गवर्नेंस’ च्या या अभियानात तुम्हा सर्वांना, देशाच्या प्रत्येक संस्थेला सहभागी व्हायचे आहे. Ownership घ्यायची आहे, Co-traveler म्हणून वाटचाल करायची आहे. आपल्या प्रत्येक घटनात्मक संस्थेसाठी हा अमृतकाळातील संकल्प, 2047 मध्ये ज्यावेळी भारत शतकमहोत्सव साजरा करेल, त्यावेळी देशाला खूप मोठ्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य म्हणून उपयोगी ठरेल.

मित्रांनो,

अनेक दशकांपासून आपल्या देशात कॅगची ओळख सरकारी फायली आणि चोपड्यांमध्ये डोके खूपसून बसलेली संस्था म्हणून निर्माण झाली आहे. कॅगशी संबंधित लोकांची हीच प्रतिमा तयार झाली होती आणि याचा उल्लेख मी 2019 मध्ये ज्यावेळी मी तुमच्या कार्यक्रमात आलो होतो तेव्हा केला होता. तुम्ही अतिशय वेगाने परिवर्तन घडवून आणत आहात, प्रक्रिया आधुनिक करत आहात, याचा मला अतिशय आनंद होत आहे. आज तुम्ही advanced analytics tools चा वापर करत आहात. Geo-spatial data आणि satellite imagery चा वापर करत आहात. या नवोन्मेषाचा वापर आपल्या संसाधनांमध्येही झाला पाहिजे आणि आपल्या कार्यपद्धतीमध्येही झाला पाहिजे.

मला सांगण्यात आले आहे की तुम्ही प्राथमिक निष्कर्ष लेखा परीक्षणापूर्वीच विभागांबरोबर सामायिक करायला सुरुवात केली आहे. ही एक उत्तम पद्धती आहे. जेव्हा तुम्ही हे प्राथमिक निष्कर्ष तुमच्या वास्तविक अभ्यासात समाविष्ट कराल, तेव्हा त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सुचवले होते की तुम्ही कार्यालयामधून बाहेर पडून  लेखा परीक्षक आणि हितधारकांना भेटा. तुम्ही ही सूचना स्वीकारली.  गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात कॅगचे वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयाच्या सचिवांनी एक चर्चसत्र देखील आयोजित केले होते. या प्रयत्नांची मी प्रशंसा करतो आणि आशा व्यक्त करतो की हे उपक्रम केवळ चर्चासत्रांपुरते मर्यदित राहणार नाहीत.

हे कॅग आणि विभागांमधील भागीदारीत प्रगती करण्याचे माध्यम बनेल. जेव्हा मी हे ऐकतो की एका  ग्राम पंचायतीच्या महिला प्रमुखाला तुम्ही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे की आज आपल्या संस्था अशा प्रकारच्या खुल्या वातावरणात सर्वांच्या सहभागाने काम करत आहेत. ही क्रांती, हे अनुभव कॅगला आणि त्याचबरोबर  आपल्या लेखा परीक्षण यंत्रणेला एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. जेवढी मजबूत आणि वैज्ञानिक आपले लेखा परीक्षण होईल तेवढीच आपली व्यवस्था पारदर्शक आणि मजबूत होईल.

मित्रांनो ,

कोरोनाच्या कठीण काळात देखील कॅगने किती तन्मयतेने काम केले  याची माहिती मला मिळत असते आणि आता काही गोष्टी  मुर्मू जी यांच्याकडून देखील ऐकायला मिळाल्या. जगातील अन्य मोठ्या देशांमधून कोरोनाची लाट आपल्याकडे पोहचली, आपल्यासमोर एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे आव्हान होते, मर्यादित संसाधनांचा दबाव आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर होता  मात्र देशाने उपचारांपासून ते बचावापर्यंत प्रत्येक आघाडीवर युद्धपातळीवर काम केले. मोठमोठ्या देशांकडे  व्यापक संसाधने होती , तर आपल्याकडे अतुलनीय सामाजिक शक्ती होती.

मला सांगण्यात आले आहे की कॅगने देखील  आपल्या दायित्वाच्या पुढे जाऊन सामान्य जनतेला लसीकरणात मदत केली आहे. याच भावनेने देशातील प्रत्येक संस्था , प्रत्येक देशवासी आपले कर्तव्य बजावत होता. आपण हे पाहिले नाही की आपले काम काय आहे , आपण हे पाहिले की आपण काय करू शकतो. म्हणूनच शतकातील ही सर्वात मोठी  महामारी जितकी आव्हानात्मक होती, तेवढीच तिच्याविरोधात देशाची लढाई देखील  असाधारण होती.

आज आपण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवत आहोत. काही आठवड्यांपूर्वी देशाने 100 कोटी लसींच्या मात्रांचा टप्पा पार केला. मला वाटते की आपल्या दैनंदिन कामकाजाबरोबरच कॅगने महामारी विरोधात  देशाच्या लढाई दरम्यान ज्या चांगल्या पद्धती विकसित झाल्या आहेत त्यांचा अभ्यास करावा. देशाने यामधून जे काही नवीन शिकले , नवीन स्वीकारले, जो नियोजनबद्ध अभ्यास केला , तो भविष्यात जगातील सर्वोत्तम पद्धती बनण्यात देखील मदत करतील, जगाला भविष्यातील  महामारींविरोधात लढण्यासाठी तयार करतील, बळ देतील.

मित्रांनो ,

जुन्या काळी माहिती कथांच्या माध्यमातून  प्रसारित व्हायची. कथांच्या माध्यमातूनच इतिहास लिहिला जायचा.  मात्र आज 21 व्या शतकात,  डेटा हीच माहिती आहे , आणि आगामी काळात आपला इतिहास देखील डेटाच्या माध्यमातून पाहिला आणि समजून घेतला जाईल. भविष्यात डेटाचे इतिहासावर वर्चस्व राहील ! आणि जेव्हा  डेटा आणि त्याच्या मूल्यमापनाबद्दल बोलले जाते तेव्हा तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणीही  नाही. म्हणूनच,  आज स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवात  देश जे प्रयत्न करत आहे, जी उद्दिष्टे घेऊन पुढे मार्गक्रमण करत आहे, भविष्यात जेव्हा देशाच्या या प्रयत्नांचे, या कालखंडाचे मूल्यमापन केले जाईल, तेव्हा तुमचे  काम, तुमचे दस्तावेज़  त्याचा  एक प्रामाणिक आधार बनतील. जसे आज आपण आपल्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित इतिहास पाहतो, त्यापासून प्रेरणा घेतो, तसेच जेव्हा देश स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण करेल  तेव्हा तुमचे आजचे अभ्यासाचे निष्कर्ष त्यावेळी भारतासाठी आपल्या इतिहासात डोकावून पाहण्याचे, त्यापासून शिकण्याचे माध्यम बनू शकतात .

मित्रांनो ,

आज देश अशी कितीतरी कामे करत आहे जी अनपेक्षित देखील आहेत आणि अभूतपूर्व देखील आहेत. आताच तुम्हाला उदाहरण म्हणून मी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाचा उल्लेख केला होता, त्याचप्रमाणे अनेक संकल्पांमधील देशवासियांचे कितीतरी प्रयत्न तुम्हाला पहायला मिळतील. काही वर्षांपूर्वी आपण सरकारी खात्यांमध्ये  लाखों-कोट्यवधींचा हिशेब तर करत होतो , मात्र सत्यस्थिती ही देखील होती की देशातील कोट्यवधी नागरिकांजवळ स्वतःचे बँक खाते देखील नव्हते.  कितीतरी कुटुंबे अशी होती ज्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घर नव्हते, डोक्यावर पक्के छत नव्हते.  पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज जोडणी, घरात  शौचालय , गरीबांना उपचारांची सुविधा, या मूलभूत गरजा  आपल्याच देशातील कोट्यवधी लोकांसाठी ऐषोआरामाच्या सुविधा होत्या.  मात्र आज ही परिस्थिती बदलली आहे आणि वेगाने बदलतही आहे. देश आज या टप्प्यावर पोहचला आहे त्यामागे कितीतरी देशवासियांची अथक मेहनत आहे , त्यांचे कितीतरी परिश्रम यामागे आहेत. आपले आरोग्य क्षेत्रातील लोक असतील, बँकिंग क्षेत्रातील लोक असतील, सरकारी विभाग आणि प्रशासनातील लोक असतील, किंवा मग आपले खासगी क्षेत्र असेल, , या सर्वांनी  अभूतपूर्व सामंजस्यासह असाधारण स्तरावर काम केले आहे. तेव्हा कुठे गरीबाच्या दारी त्याचे अधिकार पोहचणे शक्य झाले आहे , तेव्हा कुठे देशाच्या विकासाला ही गती प्राप्त झाली आहे.

मित्रांनो ,

समाजात या निर्णयांचा परिणाम इतका व्यापक होतो की आपण ते तेव्हाच समजू शकतो जेव्हा या दिशेने केंद्रित अभ्यास केला जाईल. कॅगने देखील देशाच्या या प्रयत्नांचे, या परिणामांचे विश्लेषण करायला हवे. हा  लेखा-जोखा देशाच्या  सामूहिक प्रयत्नांचे  प्रकटीकरण असेल, देशाचे  सामर्थ्य आणि त्याच्या आत्मविश्वासाचे  एक जिवंत दस्तावेज असेल. त्याचबरोबर, यापुढच्या सरकारांसाठी कामकाजाच्या अधिक चांगल्या पद्धतींचा शोध घेण्यात हे तुमचे दस्‍तावेज उपयुक्त ठरतील.

मला पूर्ण विश्वास आहे की देशासाठी तुमचे  योगदान अविरत सुरूच राहील, देशाच्या विकासाला नवी गती देत राहील.

याच विश्वासासह तुम्हा सर्वांचे खूप-खूप  धन्यवाद ! आणि तुम्हा सर्वांना अनेक-अनेक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *