केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या हस्ते गोव्यात पणजी येथे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे 10 डिसेंबर रोजी होणार उद्‌घाटन

दैनिक समाचार

गोव्यात पणजी येथे 10 ते 13 डिसेंबर दरम्यान भरणार असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 चे उद्‌घाटन  केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा आणि अंतराळ विभागाचे  केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांच्या हस्ते होणार आहे.

‘आजादी का अमृतमहोत्सव’- समृद्ध भारतासाठी सर्जनशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उत्सव ही भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची मुख्य कल्पना असेल आणि  या कल्पनेवर आधारित बारा मोठे उपक्रम (मेगा इव्हेन्ट्स) या महोत्सवाचा भाग असतील असे जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाची मालिका ही शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विस्तृत श्रेणीचा विकास व सविस्तर मांडणी तसेच नवे संशोधन यासंदर्भात भारताच्या दूरगामी दृष्टीकोनाचा अजोड भाग आहे, असे जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून ग्रामीण भारतासाठी धोरण आखणी हे सुद्धा यामागील एक लक्ष्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव युवा देशभरातील विज्ञार्थ्यांना, वैज्ञानिकांना आणि तंत्रज्ञांना ज्ञान, कल्पना यांची देवाणघेवाण करण्यासाठी मंच उपलब्ध करून देईल, तसेच गेल्या सात वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, स्वस्थ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट खेडी, स्मार्ट शहरे, नमामी गंगे, उन्नत भारत अभियान यासारख्या महत्वाच्या उपक्रमांना प्रदर्शित करेल. सामान्य लोकांनी केलेले संशोधन आणि समाजाला उपयुक्त तंत्रज्ञान उपयोगात आणणे हा विज्ञान महोत्सवाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर्षी भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे, आजादी का अमृतमहोत्सव म्हणून साजरी करत आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्सवात पाच स्तंभाच्या समावेशाची कल्पना मांडली आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2021 मधील अनेक कार्यक्रमातून हे प्रतिबिंबित होईल असे जितेंद्र सिंग यांनी नमूद केले.

भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय, भू-विज्ञान मंत्रालय आणि भारताची स्वदेशी चळवळ असलेली विज्ञानभारती यांचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा प्रथम कार्यक्रम 2015 या वर्षी पार पडला, तर सहावा कार्यक्रम 2020मध्ये झाला. भारतीय नागरिक आणि जगभरातील लोकांबरोबर विज्ञानाचा उत्सव करणे हे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

या चार दिवसात विज्ञानाधारित चित्रपटांचा महोत्सव, वैज्ञानिक साहित्य महोत्सव, अभियांत्रिकी विद्यार्थी महोत्सव, वैज्ञानिक खेडे महोत्सव, पारंपारिक कला आणि कलाकार महोत्सव, जागतिक विक्रमांचे गिनीज बुक, खेळ आणि खेळणी उत्सव, जागतिक भारतीय वैज्ञानिक व तंत्रज्ञांची बैठक, नवयुगाच्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, राष्ट्रीय सामाजिक संघटना व संस्था यांची बैठक अश्या उपक्रमांचा समावेश असेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *