इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी आणि सर्जनशील प्रतिभा असलेली 75 व्यक्तिमत्त्वे गोव्यात होत असलेल्या 52 इफ्फीमध्ये सहभागी होणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत सुरु करण्यात आलेला हा अभिनव उपक्रम देशातील नावनिर्मितीक्षम तरुण कलाकारांना आणि उमलत्या प्रतिभांना ओळखून त्यांना आणखी बहरण्याची संधी देईल.
या उपक्रमासाठी निवडलेली ’उद्याची 75 सर्जनशील मने’ गोव्यात होत असलेल्या 2021 सालच्या इफ्फीचा भाग असतील आणि त्यांना सर्व तज्ञ वर्गांमध्ये तसेच संवादात्मक चर्चा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल तसेच इतर अनेक उपक्रमांसह चित्रपट उद्योगातील आघाडीच्या व्यक्तींशी विचारांची देवाणघेवाण करता येईल. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक उमेदवाराची प्रवास तसेच निवास व्यवस्था महोत्सवाच्या आयोजकांकडून केली जाईल.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी 22 ऑक्टोबर रोजी या अभिनव उपक्रमाची घोषणा केली होती. तेव्हा ते म्हणाले होते की इफ्फीची 52 वी आवृत्ती भारतभरातील उमलत्या युवा प्रतिभांना चित्रपट निर्माते आणि या उद्योगाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठीचा मंच उपलब्ध करून देईल
देशभरात घेण्यात आलेल्या एका स्पर्धेद्वारे या उपक्रमात सहभागी होणाऱ्या युवा चित्रपट निर्मात्यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी देशभरातून 400 पेक्षा अधिक अर्ज सादर करण्यात आले होते.
’उद्याची 75 सर्जनशील मने’ निवडण्याचे काम खालील मुख्य परीक्षक मंडळ आणि निवड परीक्षक मंडळ यांच्याकडे होते :
मुख्य परीक्षक
प्रसून जोशी – प्रसिध्द गीतकार आणि सीएफबीसीचे अध्यक्ष
केतन मेहता – प्रसिध्द दिग्दर्शक
शंकर महादेवन – प्रसिध्द भारतीय संगीतकार आणि गायक
मनोज वाजपेयी – प्रसिध्द अभिनेता
रसूल पुकुट्टी – ऑस्कर विजेते ध्वनी मुद्रक
विपुल अमृतलाल शाह – प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक
निवड परीक्षक
वाणी त्रिपाठी टिकू – निर्माती, अभिनेत्री आणि सीएफबीसी सदस्य
अनंत विजय – लेखक आणि चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
यतींद्र मिश्र – प्रख्यात लेखक आणि इतर प्रकारांतील लिखाण करणारे तसेच चित्रपट विषयावरील उत्तम लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
संजय पूरण सिंग – चित्रपट निर्माता, उत्कृष्ट चित्रपटासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते
सचिन खेडेकर – अभिनेता, दिग्दर्शक
https://twitter.com/PIB_India/status/1460890711373410309