भारताचा 52 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, उद्या, 20 नोव्हेंबर 2021 रोजी सुरू होणार आहे. हा सिनेप्रेमींना जगातील सर्वात मोठ्या खंडातील वांशिक विविधतेची कॅलिडोस्कोपिक झलक भेट देणार आहे. आपला विशेष ठसा उमटवलेले, विविध आशियाई देशांमधून निवडलेले, सहा चित्रपट इफ्फी 52 च्या ‘सोल ऑफ एशिया’ विभागाअंतर्गत प्रदर्शित केले जातील.
या विशेष विभागात ज्या चित्रपटांना स्थान मिळाले ते म्हणजे “अहेद्स नी”, “कॉस्टा ब्रावा, लेबनॉन”, “ऑनोडा: 10,000 नाईट्स इन द जंगल”, “व्हिल ऑफ फॉर्च्यून अँड फँटसी”, “व्हेदर द वेदर इज फाइन” आणि “ युनी”.
यापैकी दोन चित्रपट जपानी भाषेत आहेत आणि अन्य हिब्रू, अरबी, वारे आणि इंडोनेशियन भाषेतील आहेत .
‘अहेद्स नी‘
नादव लॅपिड दिग्दर्शित, हिब्रू चित्रपट ‘अहेद्स नी’ ही एका इस्रायली चित्रपट निर्मात्याची कथा आहे. वाळवंटाच्या अगदी टोकावर असलेल्या त्याच्या दुर्गम गावात त्याला आपला एक चित्रपट सादर करायचा आहे. त्याच्या संघर्षाची ही कथा आहे.
कोस्टा ब्रावा, लेबनॉन
कोस्टा ब्रावा, लेबनॉनमधील एका मुक्त-उत्साही बद्री कुटुंबाची ही कथा आहे. त्यांच्या अस्तित्वालाच धोका असलेल्या परिस्थितीच्या तावडीतून सुटण्यासाठीची. कोस्टा ब्रावा, लेबनॉन, मूनी अकलचा हा अरबी चित्रपट आहे.
ओनोडा: 10,000 नाईट्स इन द जंगल
1944 चे वर्ष संपत आहे आणि जपानी युद्ध हरत आहे. पण ते खरेच पराभव मान्य करायला तयार आहेत का? आर्थर हरारी दिग्दर्शित ओनोडा: 10,000 नाईट्स इन द जंगल हा जपानी चित्रपट हिरू ओनोडा या दृढनिश्चयी सैनिकाचे शौर्य दाखवतो. रहस्यमय मेजर तानिगुचीच्या आदेशानुसार, ओनोडा पराभवाच्या जबड्यातून विजय मिळवण्याचा धाडसी प्रयत्न करतो; आणखी 10,000 दिवस गुप्त युद्ध सुरू करण्यासाठी तो फिलीपिन्सच्या जंगलात माघारी फिरतो.
व्हिल ऑफ फॉर्च्यून अँड फँटसी
प्रेमात पडलेल्या स्त्रिया, ज्यांचे जीवन योगायोगाच्या रंगीबेरंगी धाग्यांनी गुंफलेले असते, त्यामुळे त्यांच्या नात्यातील गुंतागुंत आणखी वाढते. भाग्य आणि कल्पनारम्यता यांच्या विलक्षण परस्पर संवादात स्वतःला मग्न करण्यासाठी जपानी दिग्दर्शक रयुसुके हामागुची यांचा व्हील ऑफ फॉर्च्यून अँड फॅन्टसी पहा.
व्हेदर द वेदर इज फाइन
वादळाने उद्ध्वस्त केले, परंतु जगण्याचा निर्धार केला. व्हेदर द वेदर इज फाइन हा चित्रपट फिलिपिनो किनारपट्टीवरील टॅक्लोबान शहरात एका मुलाच्या आणि त्याच्या आईच्या जगण्याची कहाणी सांगतो. नोव्हेंबर 2013 मध्ये हैयान या वादळाच्या प्रभावानंतर ते राहतात ते शहर मोठ्या प्रमाणात ढिगाऱ्यांखाली गेले आहे. वारे भाषेतील चित्रपटाचे दिग्दर्शन कार्लो फ्रान्सिस्को मनाताड यांनी केले आहे. वारे ही ऑस्ट्रोनेशियन भाषा आहे आणि फिलीपिन्सची पाचवी-सर्वाधिक बोलली जाणारी स्थानिक प्रादेशिक भाषा आहे.
युनी
कमिला एंडिनीचा युनी हा इंडोनेशियन चित्रपट एका हुशार आणि महत्त्वाकांक्षी किशोरवयीन मुलीची कथा चित्रित करतो. युनीचे विद्यापीठात जाण्याचे आणि आयुष्यात मोठे होण्याचे स्वप्न आहे. तथापि, तिला सामाजिक दबावावर मात करण्यासाठी तसेच तिच्या आणि स्वप्नांमध्ये उभ्या असलेल्या मिथकांना दूर करण्यासाठी अनंत संघर्षांचा सामना करावा लागतो.
हे सहा चित्रपट एकत्रितपणे इफ्फी 52 महोत्सवातील प्रतिनिधींना आशियाच्या आत्म्याचे सूक्ष्म प्रतिरुप, महाद्वीपातील सामूहिक एकात्मतेची एक खास झलक सादर करण्याचा प्रयत्न करतात.
***