पंतप्रधानांच्या हस्ते मध्यप्रदेशात भोपाळ येथे विविध रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

दैनिक समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशात भोपाळ येथे विविध रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण केले. तसेच त्यांनी भोपाळ येथील पुनर्विकसित राणी कमलापती रेल्वे स्थानक देशाला अर्पण केले. गेज परिवर्तन आणि विद्युतीकरण झालेला उज्जैन-फतेहाबाद चंद्रावतीगंज ब्रॉड गेज टप्पा, भोपाळ-बारखेडा विभागातील तिसरा लोहमार्ग, गेज परिवर्तन आणि विद्युतीकरण झालेला मथेला-निमरखेरी ब्रॉड गेज टप्पा आणि विद्युतीकरण झालेला गुणा-ग्वाल्हेर विभाग यांच्यासह पंतप्रधानांनी रेल्वेतर्फे मध्य प्रदेशात सुरु असलेल्या विविध उपक्रमांचे देशार्पण केले. पंतप्रधानांनी उज्जैन आणि इंदूर दरम्यान चालविण्यात येणाऱ्या दोन नव्या मेमू गाड्यांना हिरवा झेंडा देखील दाखविला. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भोपाळसारख्या ऐतिहासिक रेल्वे स्थानकाचे केवळ पुनरुज्जीवन होत नसून राणी कमलापती यांचे नाव जोडले गेल्याने या स्थानकाचे महत्त्व देखील वाढले आहे, से प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.  आज गोंडवनाच्या अभिमानाशी भारतीय रेल्वेच्या अभिमानाचा संयोग होत आहे. आजच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी वैभवशाली इतिहास आणि समृध्द आधुनिक भविष्यकाळाच्या संगमाचे प्रतीक म्हटले आहे. आज साजऱ्या होत असलेल्या आदिवासी गौरव दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा देखील दिल्या.  या प्रकल्पांमुळे मध्य प्रदेशच्या लोकांना खूप फायदा होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

भारत देश कशा प्रकारे बदलतो आहे आणि स्वप्ने सत्यात उतरत आहे याचे भारतीय रेल्वे उत्तम उदाहरण आहे असे ते पुढे म्हणाले. “6-7 वर्षांपूर्वी पर्यंत भारतीय रेल्वेशी ज्यांचा संबंध यायचा ते भारतीय रेल्वेला केवळ दूषणे देत असत. ही परिस्थिती बदलण्याची आशा देखील लोकांनी सोडून दिली होती. पण जेव्हा एखादा देश त्याच्या वचनांच्या पूर्ततेसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हा सुधारणा होतात, बदल घडतात, हे आपण गेल्या काही वर्षांपासून सतत पाहत आहोत” अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

पंतप्रधान म्हणाले की देशातील आयएसओ प्रमाणपत्र मिळवलेले आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीतून उभारण्यात आलेले राणी कमलापती हे पहिले रेल्वे स्थानक देशाला अर्पण केले आहे. एकेकाळी केवळ विमानतळांवर उपलब्ध असणाऱ्या सुविधा आता रेल्वे स्थानकांवर देखील उपलब्ध होत आहेत असे ते म्हणाले.

आजचा भारत आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी केवळ विक्रमी गुंतवणूक करत नाही तर या प्रकल्पांना विलंब होणार नाही आणि त्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत हे देखील  सुनिश्चित करत आहे असे  पंतप्रधान म्हणाले. नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय महायोजनेमुळे देशाला उद्दिष्टपूर्तीसाठी मदत होणार आहे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की एक काळ असा होता जेव्हा रेल्वेचे प्रकल्प संरेखन टप्प्यापासून प्रत्यक्ष जमिनीवर सुरु होण्यासाठी कित्येक वर्षांचा कालावधी जात असे. पण आज भारतीय रेल्वे विभाग नव्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यात तत्परता दाखवत आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदविले.

रेल्वे हे केवळ दोन ठिकाणांतील अंतर पार करण्याचे मध्यम नाही तर ते देशातील संस्कृती, देशातील पर्यटन आणि यात्रा यांना जोडणारे महत्त्वाचे माध्यम देखील आहे असे ते म्हणाले.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर इतक्या दशकांनी प्रथमच भारतीय रेल्वेच्या क्षमतांचा इतक्या मोठ्या प्रमाणात शोध घेतला जात आहे. पूर्वी, जरी रेल्वेचा उपयोग पर्यटनासाठी केला जात होता तरी ते देखील विशिष्ट वर्गांसाठी मर्यादित झाले होते. सर्वसामान्य माणसाला प्रथमच किफायतशीर दरात पर्यटनाचा आणि यात्रेचा अध्यात्मिक अनुभव घेण्याची संधी मिळत आहे. रामायण परिक्रमा गाडी हा असाच एक नाविन्यपूर्ण प्रयत्न आहे अशी माहिती त्यांनी दिली.

परिवर्तनाचे आव्हान स्वीकारून त्याचा उत्तम उपयोग केल्याबद्दल पंतप्रधानांनी रेल्वे विभागाचे कौतुक केले.

https://youtu.be/0AYTEvU5fyM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *