‘आझादी का अमृतमहोत्सव’ उपक्रमांतर्गत केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान आणि भू-विज्ञान खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते आज ‘टेक नीव @75’ चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी यशस्वी स्टार्टअप उद्योगांशी संवाद साधला. यामध्ये आजच्या ‘जनजातीय गौरव दिनानिमित्त’ आदिवासी समुदायाने सुरु केलेल्या स्टार्ट अप उद्योगांचा समावेश करण्यात आला होता.
15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरी करण्याच्या पंतप्रधानांच्या ऐतिहासिक निर्णयाचा संदर्भ देत डॉ.जितेंद्र सिंग म्हणाले, “आदिवासी समुदायांच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाच्या दृष्टीने, त्यांच्यातील वैज्ञानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी वर्ष 2022 च्या अखेरीपर्यंत सरकार देशाच्या निरनिराळ्या भागांत अनुसूचित जमातींसाठी 30 एसटीआय म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान-नवोन्मेष केंद्रांची (सायन्स-टेक्नॉलॉजी-इनोव्हेशन हब्स) स्थापना करणार आहे.” अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी प्रस्तावित 75 एसटीआय केंद्रांपैकी 20 केंद्रांची स्थापना विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने केली असून याद्वारे होणाऱ्या शेती, बिगर शेती आणि अन्य उपजीविकाविषयक उपक्रमांमुळे 20,000 लोकांचा थेट फायदा होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जीआयआय म्हणजे ‘जागतिक नवोन्मेष क्रमवारीत’ भारताची घोडदौड सुरु असल्याचा पुनरुच्चार करत डॉ.सिंग यांनी, कोविड संकटातही क्रमवारी सुधारून भारताने 46 वे स्थान पटकावल्याच्या कारणांचा उल्लेख केला.
नवोन्मेषामध्ये गुंतवणूक, वैज्ञानिक क्षेत्रातील उत्पादकता, तसेच संशोधन व विकास यासाठी खर्च केल्यामुळेच जगातील सर्वाधिक नवोन्मेषी आणि अभिनव विचारांवर चालणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताची गणना होऊ शकत असल्याचे ते म्हणाले.
‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच ‘स्थानिक उत्पादनांचा वापर आणि प्रसिद्धी’ ही मध्यवर्ती संकल्पना डॉ.जितेंद्र सिंग यांनी अधोरेखित केली. “विज्ञान हे वैश्विक पातळीवरचे असले तरी, तंत्रज्ञान मात्र स्थानिक पातळीवरील समस्या सोडवणारे स्थानिक गरज भागविणारे असेच असले पाहिजे. अशा स्वरूपाच्या तंत्रज्ञानामुळेच, आरोग्यसेवा, गृहनिर्माण, स्वच्छ हवा-पाणी-ऊर्जा, कृषी उत्पादकता, अन्नप्रक्रिया इत्यादींबाबतचे प्रश्न सोडवून स्थानिक पातळीवर अनुकूल उत्तरे शोधता येतात, व पर्यायाने जीवनमान सुधारून सर्वसामान्य जनतेसाठी जगणे सुलभ व सुसह्य होऊ शकते”, असेही डॉ.सिंग यांनी सांगितले.