संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे दिवंगत मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था असे नामकरण करणाऱ्या फलकाचे संरक्षण मंत्र्यांनी केले अनावरण

दैनिक समाचार

संरक्षण मंत्यांच्या भाषणाची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • पर्रीकरजींचा स्वदेशीकरणाचा आग्रह आणि राजकीय-लष्करी समन्वयासाठी प्रयत्नांमुळे ते एक अनमोल ठेवा बनले.
  • MP-IDSA अर्थात मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था म्हणजे संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील सर्वोत्तम थिंक टँक आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 15 नोव्हेंबर 2021 रोजी नवी दिल्ली येथील संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेत माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या नावाने संस्थेचे नामकरण करणाऱ्या एका फलकाचे अनावरण केले. माजी संरक्षण मंत्र्यांच्या स्मरणार्थ या वर्षाच्या सुरुवातीला सर्वसाधारण सभेने सर्वानुमते घेतलेल्या निर्णयानंतर संस्थेचे अध्यक्ष आणि संरक्षण मंत्री यांनी संस्थेचे नामकरण मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था (MP-IDSA) असे केले आहे. माजी संरक्षण मंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणात दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले, ज्यांनी संरक्षण मंत्री असताना संस्थेच्या कार्याला चालना देण्यावर भर दिला होता. त्यांच्यासोबतच्या दीर्घ सहवासाची आठवण करून देताना राजनाथ सिंह म्हणाले की, पर्रीकर जींना संरक्षणाशी संबंधित बाबींची सखोल माहिती होती आणि स्वदेशीकरणाचा त्यांचा आग्रह आणि राजकीय-लष्करी समन्वयासाठी प्रयत्नांमुळे ते एक अनमोल ठेवा बनले.

MP-IDSA च्या 57 व्या स्थापना दिनानिमित्त संस्थेच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक करताना राजनाथ सिंह म्हणाले की, संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रातील गेल्या सहा दशकांतील सर्वोत्तम थिंक टँक म्हणून ही संस्था उदयास आली आहे.

वेगाने बदलणारी जागतिक सुरक्षा परिस्थिती आणि कोविड-19 महामारी सारखे अदृश्य धोके लक्षात घेऊन अधिक सतर्क आणि जागरूक राहण्याच्या गरजेवर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. त्यांनी MP-IDSA ला देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेला नवी दिशा देणारा अमूल्य ठेवा असल्याचे म्हटले.

राजनाथ सिंह यांनी संस्थेला राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात अधिक खोलवर चिंतन करण्याचे आवाहन केले जेणेकरून ते राष्ट्राच्या सर्वांगीण वाढीसाठी देखील उपयुक्त ठरू शकेल.

संरक्षण मंत्र्यांनी यावेळी 100 किलोवॅट ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. सरकारी इमारतींवरील सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यात आली आहे.

राजनाथ सिंह यांनी संस्थेतील ओपन एअर जिमचे उद्घाटनही केले आणि हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले.

देशाचे संरक्षण, सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि धोरणात्मक अत्यावश्यकता यांच्याशी संबंधित विस्तृत संशोधन संकल्पनांचा समावेश असलेल्या संस्थेच्या गणमान्य व्यक्तींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशनही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी केले.

आपल्या स्वागतपर भाषणात मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे महासंचालक राजदूत सुजन आर चिनॉय यांनी संरक्षण, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये संस्थेचे कार्य पुढे नेण्यात मदत आणि मार्गदर्शन केल्याबद्दल राजनाथ सिंह यांचे आभार मानले.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *