संरक्षण मंत्र्यांच्या भाषणाची प्रमुख वैशिष्ट्ये:
- मानवतावादी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा – ‘सागर’चे सर्वात महत्त्वाचे एक उद्दिष्ट
- आपले सशस्त्र दल नेहमीच गरजेच्या वेळी मित्र देशांसाठी धावून गेले
- कोविड नंतरच्या जगात जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक उपायांची गरज
- नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांसोबत सामायिक केले पाहिजेत
- कोविड नंतर 2030 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी जागतिक आणि राष्ट्रीय धोरणांमध्ये नवीन कल्पनांची गरज
“आपल्या सशस्त्र दलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे की ते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींमध्ये भेदाभेद न करता गरजेच्या वेळी मित्र देशांसाठी धावून जातात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतात,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 24 नोव्हेंबर, 2021 रोजी आपत्ती व्यवस्थापनावरील 5 व्या जागतिक परिषदेचे आभासी उद्घाटन करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सागर’ (क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास ) या संकल्पनेत अंतर्भूत असलेल्या हिंद महासागरासाठी भारताच्या दृष्टीकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. किनारी राज्यांमध्ये आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढवणे; जमीन आणि सागरी प्रदेशांचे रक्षण करण्यासाठी क्षमता वाढवणे; शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कार्य करणे; नील अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक आपत्ती, चाचेगिरी आणि दहशतवाद यासारख्या अपारंपरिक धोक्यांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक कृतीला प्रोत्साहन देणे हे ‘सागर’ चे विविध घटक आहेत असे त्यांनी अधोरेखित केले.
राजनाथ सिंह म्हणाले की या प्रत्येक घटकाकडे समान लक्ष देण्याची आवश्यकता असून मानवतावादी संकटे आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रभावी प्रतिसाद यंत्रणा विकसित करणे हे सागर उपक्रमाचे सर्वात महत्वाचे स्तंभ आहे. मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण (HADR) कार्यात या प्रदेशात सर्वप्रथम मदत पुरवणाऱ्या सशस्त्र दलांचे कौतुक करून ते म्हणाले, जगाशी आणि विशेषत: हिंद महासागर प्रदेश (IOR) सोबत भारताचे संबंध मजबूत आहेत.
येमेन, श्रीलंका, मादागास्कर, मॉरिशस आदी मित्रदेशना सशस्त्र दलांनी केलेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला.महामारीनंतरच्या जगात जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक उपायांच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
राजनाथ सिंह यांनी अंतराळ, दळणवळण, जैव-अभियांत्रिकी, जैव-वैद्यकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील उदयोन्मुख अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दलही मत मांडले . ते म्हणाले, यामध्ये अचूक साधने आणि सेन्सर्सचा समावेश आहे जे आपत्तींच्या जोखमींचे मूल्यांकन आणि पूर्व सूचनेद्वारे संप्रेषण करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवू शकतात. आपत्तीनंतरची सुधारणा आणि पुनर्बांधणीसाठीच्या स्मार्ट तंत्रज्ञानावरही त्यांनी भर दिला. या तंत्रज्ञानाचे फायदे सर्वांसोबत सामायिक करण्यावर आणि या तंत्रज्ञानाचा अधिक चांगला उपयोग आणि वापरासाठी क्षमता विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी योग्य संरचना उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यवस्था मजबूत करण्यासाठी संरक्षण मंत्री यांनी अधिक जवळून सहकार्य करण्याचे आवाहन केले. 2030 शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर महामारीच्या प्रभावाचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्याची सूचना केली आणि उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी जागतिक आणि राष्ट्रीय धोरणांमध्ये नवीन कल्पनांचा समावेश करण्याची गरज व्यक्त केली.
नवी दिल्ली येथे 24-27 नोव्हेंबर 2021 दरम्यान आयआयटी दिल्लीच्या संकुलात 5 वी जागतिक आपत्ती व्यवस्थापन परिषद (WCDM) आयोजित करण्यात आली आहे.