केंद्रीय पर्यटन तसेच बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत मंगेशी, प्रियोळ येथील पर्यटन पायाभूत सुविधा विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती होती.

याप्रंसगी बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले, केंद्र सरकार ‘स्वदेश दर्शन योजना’, ‘तीर्थक्षेत्र कायाकल्प आणि अध्यात्म संवर्धन योजना (PRASAD)’ या योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारला तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या विकासासाठी मदत करत आहे. गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र आहे, त्यामुळे पर्यटन सुविधांचा विस्तार करण्यावर भर देण्यात आहे. राज्य सरकारच्या विभागांनी पर्यटन क्षेत्राशी निगडीत जास्तीत जास्त प्रस्ताव पाठवावे. राज्याच्या पर्यटनवृद्धीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे नाईक म्हणाले.

गोवा पर्यटन विकास महामंडळाने 21, 275 चौ.मी. जागेत पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. यात पहिल्या टप्प्यात 58 दुकानांसाठी जागा तसेच 75 कार, 75 दुचाकी, 70 मिनी बस, 40 बस यांच्या पार्किंगसाठी जागा. परिसरात महिला, पुरुष आणि दिव्यांग यांच्यासाठी शौचालय तसेच तीन मदर केअर रुम याठिकाणी बांधण्यात आल्या आहेत. विकास क्षेत्रात ड्रेनेज, फूटपाथ आणि रोषणाई यांचाही समावेश आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पाचा पहिला टप्पा 6.25 कोटी रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी याप्रसंगी गोवा पर्यटन विभागाचे पर्यटकांसाठी ऍप तयार केल्याबद्दल कौतुक केले. या ऍपमध्ये पर्यटकांना भेट देण्याची ठिकाणे, हॉटेल्स आणि रेस्तराँ तसेच आप्तकालीन दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
***