सुगंधी आणि लांब दाण्याच्या दर्जेदार बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी दर्जेदार उत्पादनाला चालना मिळावी म्हणून कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरणाच्या( अपेडा) बासमती निर्यात विकास मंडळाने तांदूळ उत्पादक प्रदेशांमधील बासमती उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्तम कृषी पद्धतींविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी पावले उचलली आहेत.
बासमती निर्यात विकास संस्थेने पुढाकार घेत पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली या राज्यांच्या तांदूळ निर्यातदार संस्था, कृषी विद्यापीठे आणि संबंधित राज्यांच्या कृषी विभाग यांच्या सहयोगाने जागरुकता व प्रशिक्षणाचे 75 कार्यक्रम आयोजित केले. या कार्यक्रमांमार्फत या सात तांदूळ उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या बासमती तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. बासमती तांदूळ उत्पादक राज्यांमधील विविध शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार संस्था यांचा तांत्रिक भागीदार या नात्याने बासमती निर्यात विकास संस्था यात सहभागी होती.
भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करणाऱ्या ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून उत्तर प्रदेश मधील गौतमबुद्धनगर जिल्ह्यात जहांगीरपूर गावामध्ये 16 जुलै 2021 ला जागृतीपर प्रशिक्षण कार्यक्रमाचा आरंभ केला. ‘कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि उत्तम कृषी पद्धतींचा स्वीकार’ याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव निर्माण करणे हे या शेतकऱ्यांसाठीच्या जागरुकता मोहिमेचे उद्दिष्ट होते.
दर्जेदार बियाण्यांच्या कमतरतेची समस्या सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनाचे प्रशिक्षण देणे हा या मोहिमेचा आणखी एक उद्देश होता.
या कार्यशाळेत शेतकऱ्यांना बासमती तांदळाच्या पिकांवरील रोग, त्यांचे व्यवस्थापन याबद्दल तसेच विविध कीटक आणि अळ्या ओळखण्याच्या पद्धतींबद्दल माहिती देण्यात आली. बासमती तांदळाच्या निर्यातीमधील अडचणी आणि तांदूळ उद्योगाच्या अपेक्षा याबद्दलही 2021 च्या हंगामातील तांदूळ उत्पादकांना व निर्यातदारांना कल्पना देण्यात आली.
कृषी आणि अन्न प्रक्रिया निर्यात प्राधिकरण हे भारतात गंगेच्या मैदानी प्रदेशात पिकणाऱ्या बासमती तांदळाला मिळालेल्या भौगोलिक ओळखीची म्हणजेच जीआय टॅगची एकमेव धारक संस्था आहे. हे भौगोलिक ओळख (GI tag) प्रमाणन फेब्रुवारी 2016 रोजी देण्यात आले. त्यानुसार पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, जम्मू काश्मीर या राज्यातील 77 जिल्हे बासमती तांदूळ उत्पादक प्रदेश म्हणून गणले जातात.
बासमती निर्यात विकास संस्था तर्फे आयोजित या मोहिमेत वैज्ञानिकांनी बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या खबरदारीबाबत माहिती दिली. निर्यातीच्या वेळी धान्यावर कीटकनाशकांचे अवशेष राहू नयेत, यासाठीच्या उपाययोजना आणि रोपवाटिकेमध्ये वाणांची वाढ करणे, एकात्मिक पोषण आणि जल व्यवस्थापन यांसह तंत्रज्ञान हस्तांतरणाविषयी त्यांना सविस्तर माहिती दिली.