पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 15 नोव्हेंबर हा दिवस, शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला समर्पित आदिवासी गौरव दिन म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली आहे. त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती भावी पिढ्यांना व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संथाल, तामर, कोल, भिल्ल, खासी आणि मिझो यांसारख्या आदिवासी समुदायांच्या अनेक चळवळींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकटी दिली. आदिवासी जनतेच्या क्रांतिकारी चळवळी आणि संघर्ष त्यांच्या अतुलनीय धैर्याचे आणि सर्वोच्च बलिदानानचे दर्शन घडवतात. ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध देशातील विविध प्रदेशातील आदिवासी चळवळी राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडल्या गेल्या आणि देशभरातील जनतेला त्यातून प्रेरणा मिळाली. मात्र, या आदिवासी वीरांबद्दल बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाही. 2016 च्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणाच्या अनुषंगाने, भारत सरकारने देशभरातील 10 आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयांना मंजुरी दिली.
15 नोव्हेंबर ही तारीख बिरसा मुंडा यांची जयंती आहे. देशभरातील आदिवासी समुदाय त्यांना भगवान म्हणून पूज्य मानतात. बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश वसाहतवादी व्यवस्थेच्या शोषक व्यवस्थेविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि ‘उलगुलान’ (क्रांती) ची हाक देत ब्रिटीश दडपशाहीविरुद्ध चळवळीचे नेतृत्व केले. या घोषणेमध्ये आदिवासी समुदायांचा गौरवशाली इतिहास आणि सांस्कृतिक वारसा सन्मानित करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी साजरा केला जाईल आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि शौर्य, आदरातिथ्य आणि राष्ट्रीय अभिमानाच्या भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी आदिवासींच्या प्रयत्नांची दखल याद्वारे घेतली जाईल. बिरसा मुंडा यांनी अखेरचा श्वास घेतलेल्या रांची येथील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
आदिवासी लोकांचा 75 वर्षांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्व साजरे करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2021 या कालावधीत आठवड्याभराचा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे.
उत्सवाचा एक भाग म्हणून, राज्य सरकारांसोबत संयुक्तपणे अनेक उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे आणि प्रत्येक उपक्रमामागील संकल्पना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींची कामगिरी आणि शिक्षण, आरोग्य, उपजीविका, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास यांमध्ये भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजना दाखविणे आहे. या कार्यक्रमांमध्ये आदिवासींचा वैशिष्ठयपूर्ण सांस्कृतिक वारसा, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान, प्रथा, हक्क, परंपरा, पाककृती, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका या गोष्टीही दाखवल्या जातील.